संतांची शिकवण
मराठी संतांची शिकवण सन्मार्गाचा प्रवास अवघड असतो, तरी पण माणुस त्या मार्गाने निघाला की आपला उद्धार निश्चित होतो. संतांची शिकवण आपल्याला सन्मार्गाची वाट दाखविते. संत कुणाला म्हणतात ? ज्यांना सत्याची अनुभूती आली, अशी देवमाणसे म्हणजे संत. सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी निर्धारपूर्वक झटणाऱ्या थोर माणसांना संत म्हटले गेले. माणसाचेच रूपांतर संतात झाले. महाराष्ट्राची एक स्वतःची वेगळी संस्कृती आहे. मराठी संस्कृती ही मराठी संतांची संस्कृती आहे. ग्यानबा – तुकारामाची ही संस्कृती आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक श्रीमंत संत परंपरा महाराष्ट्राला मिळाली. आपल्या मराठी संतांनी इतर प्रांतातील संतांना प्रेरणा दिली. सगळे संत आमचे आहेत, पण मराठी संत हे अधिक जवळचे आहेत. सगळ्यांना ते माझे वाटतात- कविवर्य वसंत बापट म्हणतात – कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच. जय देवाचा जय बोला परि माझ्या नाम्याचा नाच || खऱ्या अर्थाने मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा पाया तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरानी घातला आणि सतराव्या शतकात त्यावर कळस चढविण्याचे काम संत तुकारामानी केले. संत कवयित्री बहीणाबाईनी – ज्ञानद...