संतवाणी- संतांची शिकवण |
महाराष्ट्राच्या पावन भूमीवर सद्वर्तनाची , परोपकाराची, मित्रत्वाची, दया क्षमा शांती इत्यादी मूल्यांची शिकवण देण्यामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा म्हणजेच महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांचा फार मोठा हातभार आहे.
संत परंपरा सांगायची झाली तर यामध्ये निवृत्तीनाथ ,माऊली ज्ञानदेव ,सोपान , मुक्ताबाई , संत एकनाथ , संत नामदेव, जगद्गुरु तुकाराम महाराज , संत सावता महाराज, संत चोखामेळा , संत शेख महंमद , जनाबाई, गोरा कुंभार ,संत रोहिदास अशी अनेक नावे घेता येतील.
यातीलच काही संतांनी लिहिलेल्या अभंगाचा अर्थ आणि त्यातून मिळणारी शिकवण समजून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया.
# जगद्गुरु सतश्रेष्ठ तुकाराम महाराज #
अर्थेविन पाठांतर कासया करावे|
व्यर्थची मरावे घोकूनिया||
घोकूनिया काय वेगी अर्थ पाहे|
अर्थ रूप राहे होऊनिया ||
तुका म्हणे ज्याला अर्थी आहे भेटी
नाही तरी गोष्टी बोलू नका
संत तुकाराम
या अभंगातून संत तुकाराम महाराज असे सांगतात की, अर्थ समजल्याविना पाठांतर करून काय फायदा ? त्यामुळे फक्त त्रास होईल. कष्ट पडतील परंतु त्याचा उपयोग मात्र काही होणार नाही.
घोकंपट्टी करून फक्त पाठांतर होऊ शकते परंतु नुसत्या पाठांतरावर ज्ञान मिळेलच असे अजिबात नाही. कोणतीही व्यक्ती अथवा गोष्ट समजून घेण्यापूर्वी त्याचा अर्थ जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्थ समजल्यानंतर त्यानुसार आपले ज्ञान वाढवणे आणि आचरणात बदल करणे हे देखील अपेक्षित आहे.
अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज स्वतःचे उदाहरण घेऊन असे समजवतात की, जोपर्यंत तुम्हाला एखाद्या गोष्टीविषयी संपूर्ण ज्ञान झालेले नाही तोपर्यंत तुम्ही मला काहीही सांगू नका तुम्हाला जर त्यातील पूर्ण अनुभव सह आले असतील आणि त्यातील सगळे बारकावे जर तुम्हाला ठाऊक असतील तरच माझ्याशी बोला. नाहीतर तुम्हाला मला उपदेश करण्याचा काहीही अधिकार नाही.
या मधून तुकाराम महाराज दैनंदिन जीवन जगताना आपण कोणती काळजी घ्यावी याविषयी देखील मार्गदर्शन करतात. ज्या व्यक्तीला पूर्ण ज्ञान नाही अशा व्यक्तीचे अजिबात ऐकू नका.
ज्याला स्वतःला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही तो इतरांना मार्गदर्शन कशा पद्धतीने करू शकतो. असे मार्गदर्शन म्हणजे केवळ फसवाफसवीच होय. नपुंसक व्यक्तीला मदनाचे डोहाळे कसे बरे लागणार ? हे अगदी त्याप्रमाणेच आहे.
सन्मार्गाचा प्रवास अवघड असतो, तरी पण माणुस त्या मार्गाने निघाला की आपला उद्धार निश्चित होतो. संतांची शिकवण आपल्याला सन्मार्गाची वाट दाखविते. संत कुणाला म्हणतात ? ज्यांना सत्याची अनुभूती आली, अशी देवमाणसे म्हणजे संत. सर्वसामान्यांचा उद्धार करण्यासाठी निर्धारपूर्वक झटणाऱ्या थोर माणसांना संत म्हटले गेले. माणसाचेच रूपांतर संतात झाले.
महाराष्ट्राची एक स्वतःची वेगळी संस्कृती आहे. मराठी संस्कृती ही मराठी संतांची संस्कृती आहे. ग्यानबा – तुकारामाची ही संस्कृती आहे. मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी एक श्रीमंत संत परंपरा महाराष्ट्राला मिळाली. आपल्या मराठी संतांनी इतर प्रांतातील संतांना प्रेरणा दिली. सगळे संत आमचे आहेत, पण मराठी संत हे अधिक जवळचे आहेत. सगळ्यांना ते माझे वाटतात- कविवर्य वसंत बापट म्हणतात – कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच.
जय देवाचा जय बोला परि माझ्या नाम्याचा नाच ||
खऱ्या अर्थाने मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा पाया तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वरानी घातला आणि सतराव्या शतकात त्यावर कळस चढविण्याचे काम संत तुकारामानी केले. संत कवयित्री बहीणाबाईनी – ज्ञानदेवे रचिला पाया | तुका झालासे कळस || या शब्दात त्याचे वर्णन केले आहे. ज्याला आपण ब्रम्हविद्या मानतो ती सर्वाना अवगत नव्हती. ती विद्या सामान्य माणसाला साध्य नव्हती. याचे कारण ती संस्कृत मध्ये होती. संतांनी बंडख़ोरी केली. नवी परंपरा निर्माण केली. धर्माचे ज्ञान सर्वाना अवगत व्हावे यासाठी ज्ञानेश्वर माऊलीनी श्रीकृष्णाची वाणी – भगवतगीता – आपल्या मायबोलीत सांगितली.
उत्कृष्ट माहिती
ReplyDeleteछान माहिती
ReplyDeleteअभ्यास पुर्ण माहीती
ReplyDeleteUseful information
ReplyDeleteNice information
ReplyDeleteNice information
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteधन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ......
ReplyDelete